रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव या परिसरात अश्वारूढ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सन्मानाने करण्यात आली. मराठेशाहीशी थेट नाते असलेल्या घराण्यांमधील ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.
उंदीर हे गणपतीचे वाहन आहे, पण साखरपा कोंडगाव परिसरातील सरदेशपांडे, अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे, नवाथे, जोगळेकर, गद्रे, पोंक्षे, शिंदे या घराण्यांच्या घरी घोड्यावर विराजमान झालेल्या गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. ही घराणी मराठेशाहीच्या काळात विशाळगडावर अधिकारी होती.
सरदेशपांडे घराण्याकडे विशाळगड सुभ्यातील गावांच्या महसूल वसुलीचे अधिकार होते, तर अभ्यंकर घोड्यांची पागा सांभाळत असत. केळकर दिवाण होते तर केतकर कुटुंबाकडे सुभेदारी होती. रेमणे ग्रामोपाध्ये होते. या घराण्यांना साखरपा आणि परिसरातील गावांमध्ये जमिनी इनाम मिळाल्या होत्या. मराठेशाहीचा अस्त झाला, इंग्रजांचे साम्राज्य वाढीस लागल्यावर या कुटुंबांचे अधिकार लोप पावले आणि चरितार्थासाठी ही कुटुंबे गडउतार झाली. गडावरून येताना ते घोड्यावरून आले म्हणून त्यांचे गणपती घोड्यांवरून आणण्याची प्रथा सुरू झाली.
सुरुवातीला या घराण्यांकडे लाकडी अश्व होते. सरदेशपांडे, केळकर, पोंक्षे यांच्याकडे हे लाकडी अश्व आहेत. त्यांच्या गणेशमूर्ती त्याच अश्वावर उभारल्या जातात. त्यासाठी या घराण्यांमधील अश्व नागपंचमीला मूर्तिकारांकडे नेऊन देण्याची परंपरा आहे. त्यानंतर मूर्तिकार थेट त्या अश्वांवरच मूर्ती तयार करतात. रेमणे, नवाथे, अभ्यंकर, जोगळेकर यांचे अश्व आजही सुस्थितीत आहेत; पण आता त्यांवर गणपती उभारणे, अश्वारूढ गणेशमूर्तीकारांकडून आणणे, विसर्जन करणे कठीण होत चालल्याने त्यांनी मातीच्या अश्वासह मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे. बुधवारी सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्ताने या सगळ्या घरांमध्ये अश्वारूढ गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी