मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतल्याने सरकारपुढील पेच अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावर दाखल झाल्या. त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र प्रकृती खालावल्याने जरांगे यांनी त्यांच्याशी संवाद टाळला. मात्र त्यांच्या भेटीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी मनोज जरांगे यांनी चार दिवसांपासून काही खाल्लेलं नाही. त्यांना प्रचंड अशक्तपणा आलाय. डॉक्टरांनी देखील हेच सांगितलं की त्यांना अन्न न गेल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय. त्यामुळे मी त्यांना तब्येतीची काळजी घ्यावी, असं सांगितलं. त्यानंतर आंदोलकांच्या अडचणींवर भर दिला. आंदोलकांच्या अन्नाचा प्रश्न सुटला आहे, मात्र परिसरात अस्वच्छता आहे. शौचालये व पाण्याची व्यवस्था करावी आणि बीएमसीने स्वच्छतेची काळजी घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली. आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण सरकारकडे आणि पालिकेकडे पाठपुरावा करू, असे सुळे म्हणाल्या.
आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर थेट निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अधिवेशन बोलवून बिल पास करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. तुमच्याकडे अडीचशे आमदार आहेत, तुम्ही चुटकीसरशी हा प्रश्न सोडवू शकता. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला बहुमत दिले आहे, आता निर्णय घेणे तुमचे कर्तव्य आहे.”
सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली. “तुम्ही आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री झालात. मग आता सत्तेत आहात तर निर्णयही घ्या. हा प्रश्न विरोधकांवर टाकून काही होणार नाही. सत्ता म्हणजे केवळ लालबत्तीची गाडी, प्रायव्हेट विमान आणि हेलिकॉप्टर नाही. मायबाप जनतेच्या सुख-दु:खात उभे राहणे हे खऱ्या नेत्याचे काम आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
तथापि, त्यांच्या भेटीनंतर आझाद मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुप्रिया सुळे मैदानातून बाहेर पडत असताना काही मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा देत सुळे यांचा घेराव घातला.''मराठ्यांचं वाटोळ शरद पवार ने केलं'' तर काहींनी शरद पवारांविरोधातही घोषणाबाजी केली. यामुळे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला. मात्र इतर आंदोलकांनी सुळे यांना वाट करून दिली आणि त्या कारपर्यंत पोहोचल्या.
त्यानंतरही आंदोलकांनी त्यांच्या कारचा पाठलाग करत घोषणाबाजी केली. कार अडवून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. तरीही सुळे शांत राहिल्या, आंदोलकांना नमस्कार करत कारमधून निघून गेल्या.गाडी पुढे सरकल्यानंतर संतप्त आंदोलकांनी बाटल्या फेकून गाडीकडे मारल्या.परिस्थितीचा ताण वाढू नये म्हणून काही मराठा आंदोलकांनी गाडी पुढे जाऊ दिली.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आंदोलकांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “आपल्याला आक्रमक होऊन नाही तर शांततेत आरक्षण घ्यायचे आहे,” असे ते म्हणत आहेत. मात्र आंदोलकांच्या संतापामुळे कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule