सोलापूर, 31 जुलै (हिं.स.)। सोलापूर महापालिकेला स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत १८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून शहरात हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पीएचई सेंटर या दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र आणि भोगाव कचरा डेपो येथे एसएलएफ (सॅनिटरी लॅण्ड फिल प्रकल्प) उभारण्यात येणार आहे.
महापालिकेला स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत २५ कोटींचा निधी प्राप्त झाला. त्यातून शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वीपर मशिनचा मक्ता देण्यात आला. बायोमायनिंग प्रकल्पावर खर्च करण्यात आला. तर, स्मार्ट सिटी योजनेतून शहरात चार इंद्रधनू इमारत, रूपाभवानी, जुळे सोलापूर एचएसआर टाकी आणि लेप्रसी कॉलनी परिसरात असे चार ठिकाणी ट्रान्स्फर्स्टेशन कचरा संकलन केंद्रे आहेत.
आता नव्याने दोन केंद्राची भर पडणार असून, आता स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत प्रत्येकी ४ कोटी रुपये खर्चून हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पीएचई सेंटर या दोन ठिकाणी ट्रान्स्फर्स्टेशन (कचरा संकलन केंद्र) उभारली जाणार आहेत. तसेच न कुजणारा कचऱ्यातून पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याकरिता शास्त्रोक्त पद्धतीने भूगर्भात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी सॅनिटरी लॅण्ड फिल प्रकल्प भोगाव कचरा डेपो येथे उभारला जाणार आहे.
प्रकल्प उभारणीसाठी बायोएनर्जी प्रकल्पाला पाच एकर जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे. जागा भाडेतत्वावर देण्याला महापालिकेने मंजुरीही दिली आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या कामांना गती मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड