मुंबई, 5 जुलै, (हिं.स.)। हॉलिवूडमधून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते ज्युलियन मॅकमोहन यांचे ५६ व्या वर्षी निधन झाले आहे. फॅंटास्टिक फोर यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी ते ओळखले जात होते. मागील काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते.
ज्युलियन मॅकमोहन यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पत्नी कॅली मॅकमोहन यांनी अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली.
त्यांना त्यांच्या आयुष्यावर, कामावर, चाहत्यांवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम होतं. या कठीण काळात आमच्या खासगीपणाचा सन्मान करावा, हीच विनंती आहे. ज्युलियनवर प्रेम करणाऱ्यांनी त्याच्यासारखं आनंदात जगावं, हेच त्यांना अभिप्रेत होतं. असे त्यांनी आपल्या भावनिक वक्तव्यात म्हटले आहे.
ज्युलियन मॅकमोहन हे केवळ एक गुणी अभिनेते नव्हते, तर त्यांचा एक प्रभावशाली वारसा होता. ते ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान विलियम मॅकमोहन यांचे पुत्र होते. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी मॉडेलिंगपासून केली आणि नंतर टेलिव्हिजनकडे वाटचाल केली.
त्यांचा पहिला चित्रपट होता ‘वेड अँड वाइल्ड समर’. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘अदर वर्ल्ड’, ‘चार्म्ड’, ‘एनअदर डे’, ‘प्रिझनर’, ‘फायर विथ फायर’ यांसारख्या अनेक संस्मरणीय चित्रपट व मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
पण खऱ्या अर्थाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली ती २००५ मध्ये आलेल्या फॅंटास्टिक फोर या चित्रपटामुळे, ज्यामध्ये त्यांनी विक्टर वॉन डूम ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांची जागतिक स्तरावर ख्याती झाली आणि हॉलिवूडमधील त्यांची ओळख अधिक भक्कम झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर