मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित होऊन 15 दिवस पूर्ण झाले असून, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. 20 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच दमदार कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.
काजोलच्या ‘मां’ चित्रपटाने सिनेमा गृहात एन्ट्री घेतली असतानाही ‘सितारे जमीन पर’ चा प्रभाव कमी झालेला दिसत नाही. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्क च्या अहवालानुसार, या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवार, म्हणजेच 15व्या दिवशी 2.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह भारतातील एकूण कमाई 137.90 कोटींवर पोहोचली आहे.
90 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने परदेशातही उल्लेखनीय यश मिळवलं असून, आतापर्यंत जगभरात एकूण कमाई 214.5 कोटी रुपयांवर गेली आहे. हे पाहता, प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आहे, असं स्पष्ट होतं.
या चित्रपटात पहिल्यांदाच आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी एकत्र स्क्रीनवर झळकली आहे. जेनेलियाने आमिरची पत्नी सुनीता हिची भूमिका साकारली आहे, तर आमिर खान एका वादग्रस्त बास्केटबॉल कोच गुलशनच्या भूमिकेत दिसतो. डाऊन सिंड्रोम या विषयावर आधारित असलेल्या या भावनिक चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. हा प्रोजेक्ट आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांनी एकत्रितपणे प्रोड्यूस केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर