नाशिक, 5 जुलै (हिं.स.)।नाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी पुनः एकदा अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - एम सी ए - च्या टॅलेंट हंट समितिच्या चेअरमनपदासाठी निवड करण्यात आली आहे. नुकतीच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - एम सी ए - वर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली, त्या पाठोपाठ ही नियुक्ती झाल्यामुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आंनदाचे वातावरण आहे. एन डी सी एचे सेक्रेटरी समीर रकटे यांना २० पेक्षा जास्त वर्षांचा नाशिक जिल्हा संघटनेबरोबरच , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या देखील विविध समित्यांवर काम करण्याचा अनुभव आहे. समीर रकटे यांनी यापूर्वी सलग आठ वर्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धा समिती सदस्य म्हणून काम बघितले आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून टॅलेंट हंट समितीचे चेअरमन म्हणून समीर रकटे काम करत आहेत. या प्रदीर्घ अनुभवामुळेच त्यांची एम सी ए -च्या या एकूण सात सदस्यीय टॅलेंट हंट समितिच्या चेअरमनपदावर सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील क्रिकेट टॅलेंट हंट करण्याबरोबरच यावर्षीपासून सुरु होणाऱ्या झोनल अकॅडमीचे नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे हि नेमणुक पुणे येथे जाहीर करण्यात आली . नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील या राज्यस्तरीय महत्वपूर्ण पदावरील निवडीमुळे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी समीर रकटे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI