नवी दिल्ली , 3 ऑगस्ट (हिं.स.) : ओडिशातील पुरी याठिकाणी तीन गुन्हेगारांनी १५ वर्षांच्या मुलीला जिवंत जाळले.आता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी एक्सवर लिहिले की, या दुःखद बातमीने मला धक्का बसला आहे. सरकार आणि एम्स दिल्लीच्या डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही आम्ही त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आणि कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
दरम्यान, १९ जुलै रोजी ओडिशातील पुरी जिल्ह्यातील बयाबार गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून तीन जणांनी तिला जाळून टाकले.यामध्ये पीडित ७० टक्क्यांहून अधिक भाजली होती. तिला प्रथम १९ जुलै रोजी पिपली कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. नंतर त्याच दिवशी तिला विमानाने एम्स, भुवनेश्वर याठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर २० जुलै रोजी तिला दिल्ली एम्समध्ये विमानाने हलवण्यात आले. येथे तिला बर्न्स अँड प्लास्टिक सर्जरी ब्लॉकच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांची एक टीम तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होती. मुलीला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. इतक्या प्रयत्नांनंतरही अल्पवयीन मुलीला वाचवता आले नाही. ओडिशा पोलिसांनी शुक्रवारी(दि.३१) दिल्ली एम्समधील दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवला. मुलीला का पेटवण्यात आले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
या घटनेवर ओडिशा पोलिसांनीही दुःख व्यक्त करत सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बलंगा घटनेत पीडित मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. पोलिसांनी पूर्ण प्रामाणिकपणे तपास केला आहे. तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, यात इतर कोणीही सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून, या दुःखद क्षणी या प्रकरणाबद्दल कोणतीही संवेदनशील टिप्पणी करू नये अशी आम्ही सर्वांना विनंती करतो.”ओडिशाचे उपमुख्यमंत्री केव्ही सिंह देव आणि पी. परिदा यांनीही पीडितेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनीही अल्पवयीन पीडितेच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबाला सांत्वन दिले. राज्यसभा सदस्य सस्मित पात्रा यांच्या नेतृत्वाखाली बीजेडी खासदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले की ते दिल्लीतील एम्समध्ये जात आहेत.
ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी शोक व्यक्त केला.तसेच ७ दिवसांत तीन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. दास म्हणाले, ‘जर सात दिवसांत गुन्हेगारांना पकडले गेले नाही तर आम्ही डीजीपी कार्यालयाला घेराव घालू.’ ते म्हणाले की, मुलीला जाळण्याच्या घटनेला १५ दिवस उलटून गेले आहेत, परंतु या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही गुन्हेगारांना पोलिस अटक करू शकलेले नाहीत. दरम्यान, पुरी पोलिसांनी बालंगा येथील मृत मुलीच्या घराजवळ काही पोलिस तैनात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode