सोलापूर, 10 ऑगस्ट, (हिं.स.)। दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा थरार पथकातील अधिकाऱ्याने मोबाईलमध्ये शूट देखील केला आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन करताना तहसीलदार संजय भोसले यांनी कारवाई केली होती. त्यानंतर ही घटना घडली. माढा तालुक्यातील मुंगशी गावात सीना नदीच्या पात्रातून जेसीबीद्वारे वाळू उत्खनन सुरु होते. या ठिकाणी एक टाटा टिप्पर, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहनाने उत्खनन करुन वाहतूक करत असताना तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने धोका पत्करुन पकडले. यावेळी वाहने पकडू नयेत म्हणून वाळू माफियाने काळ्या स्क्रारपिओ गाडीने तहसीलदारांच्या गाडीला पाठीमागून धक्का देऊन रिव्हर्स गाडी चालवून कारवाईसाठी पुढं जाण्यास अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ पथकातील एकाने शूट केला आहे. यावेळी या वाळू माफियाने तहसीलदारासह ,मंडळ अधिकारी, तलाठी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला असून स्वप्नील कांबळेसह जेसीबी-टॅकट्रर चालकांवर गुन्हा नोंद झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड