अष्टावधान कला - एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार
संस्कृतभारती या संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेने रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, विविध विद्यालये अशा विविध संस्थांच्या सहकार्याने रत्नाग
अष्टावधान


संस्कृतभारती या संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेने रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, विविध विद्यालये अशा विविध संस्थांच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये संस्कृत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाची सांगता मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळामध्ये माधवराव मुळे भवनामधील वैद्य सभागृहामध्ये “अष्टावधान कलेच्या सादरीकरणाने” होणार आहे. त्यानिमित्त अष्टावधान कलेची प्राथमिक ओळख करून देणारा लेख.

...........

भारतीय शिक्षण परंपरेमध्ये अष्टावधान कला ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. जुन्या काळातल्या मौखिक परंपरांपैकी ही एक मौखिक परंपरा आहे. याबद्दलची माहिती प्रामुख्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारे प्रवाहित झाली आहे. ही कला प्राधान्याने दक्षिण भारतात अधिक प्रमाणात रूढ असलेली दिसते. गेल्या काही वर्षांतील या कलेची नोंद माध्यमांमधून घेतली गेली आहे.

गेली अनेक दशके शाळा-महाविद्यालयांमधून भाषेचा जो अभ्यास होतो तो प्राधान्याने लेखी स्वरूपात होतो. मौखिक अथवा वाचिक अभ्यासावर त्या मानाने कमी भर दिला गेलेला आहे. परंतु आपल्या प्राचीन परंपरेमध्ये मौखिक अभ्यासाला महत्त्वाचे स्थान होते, असे दिसते. भाषेच्या अभ्यासासाठी मौखिक अभ्यास ही खरे तर अपरिहार्य गोष्ट असायला हवी. तीच या परंपरेमध्ये आपल्याला दिसते. अष्टावधान कला भाषेच्या विविधांगी अभ्यासाचा हा एक उत्तम आविष्कार आहे.

अष्टावधान या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, अष्ट आणि अवधान. अष्ट म्हणजे आठ आणि अवधान म्हणजे विशिष्ट ठिकाणी लक्ष असणे. एकाग्रता हाही शब्द यासाठी वापरतात. मराठीमध्ये आपल्या परिचयाचा असलेल्या सावधान या शब्दामध्ये अवधान हा शब्द आलेला आहेच. अवधान हा शब्दही मराठीमध्ये वापरला जातोच. आठ गोष्टींचे अवधान ज्या कलेमध्ये दर्शविले जाते, ती कला म्हणजे अष्टावधान कला अशी त्याची एक सामान्य व्याख्या करता येईल.

या कलेमध्ये जी मुख्य व्यक्ती आहे तिला अवधानी असे म्हटले जाते. ही व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते. या व्यक्तीकडे भाषाप्रभुत्व, उत्तम धारणाशक्ती, स्मरणशक्ती, काव्यरचनेचे सामर्थ्य आणि प्रत्युत्न्नमतित्व म्हणजेच हजरजबाबीपणा असावा लागतो. या व्यक्तीला प्रश्न किंवा माहिती विचारणाऱ्या व्यक्तीला प्रच्छक असे म्हणतात. जेव्हा ८ प्रच्छक असतात तेव्हा त्याला अष्टावधान असे म्हटले जाते. १० प्रच्छक असतील तर दशावधान, १०० प्रच्छक असतील तर शतावधान तसेच अन्य प्रच्छक संख्येनुसार प्रकार आहेत. अगदी अंतिम म्हणता येईल असा सहस्रावधान हाही प्रकार आहे. हे जसे संख्येवर आधारित प्रकार आहेत, तसेच आशयावर आधारित साहित्यावधान आणि धारणावधान हे अवधानाचे दोन प्रकार मानले जातात. साहित्यावर आधारित असेल तर त्याला साहित्यावधान म्हटले जाते आणि धारणाशक्तीवर आधारित असेल तर त्याला धारणावधान म्हटले जाते.

अवधानी व्यक्तीला काय विचारायचे याचेही अनेक प्रकार आहेत. यामध्ये काही प्रकार हे तिथल्या तिथे संस्कृतमध्ये काव्यरचना करण्यासाठी विचारले जातात आणि काही प्रकार धारणाशक्तीवर आधारित असतात. या कलेच्या सादरीकरणामध्ये अवधानी व्यक्ती मध्यभागी बसते आणि त्याच्या दोन बाजूंना समान संख्येने प्रच्छक बसतात. यामध्ये चार आवर्तने अर्थात फेऱ्या असतात. काव्यरचना ही साधारणतः चार चरणांची असते. प्रत्येक आवर्तनामध्ये एक चरण रचले जाते आणि चौथ्या आवर्तनानंतर पूर्ण काव्य सादर होते. काव्यरचना सोडून अन्य विषयांवर प्रश्न विचारले जातात किंवा संवाद साधला जातो.

रत्नागिरीत होणाऱ्या अष्टावधानकलेच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये सादर होणाऱ्या प्रश्नांच्या प्रकारांची संक्षिप्त माहिती या लेखात देत आहे.

प्रथम काव्यरचनेचे विषय सांगत आहे.

१. निषिद्धाक्षरी - या प्रकारामध्ये प्रच्छक काव्य करण्यासाठी विषय देतात आणि काव्य करताना विशिष्ट अक्षर वापरू नये, असे सांगतात. उदाहरणार्थ गणपती हा विषय वर्णन करण्यासाठी दिलेला आहे आणि ग हे अक्षर वापरू नये असे सांगितले जाते. त्यावेळी गणेशासाठी ग नसलेले शब्द म्हणजेच वक्रतुंड, लंबोदर अशा प्रकारचे शब्द वापरून काव्य करणे अपेक्षित असते.

२. समस्यापूर्ती - यामध्ये एक चरण दिला जातो. तो चरण काहीतरी विचित्र अर्थाचा किंवा संगती नसलेला असतो. उदाहरणार्थ ‘रात्रौ रवि: राजते ।’ याचा अर्थ रात्री सूर्य शोभून दिसतो. असा चरण दिल्यानंतर त्याला सुसंगत होईल अशी काव्यरचना या प्रकारात अपेक्षित असते. संस्कृत शिकलेल्यांनी अभ्यासक्रमात कुठे ना कुठे समस्यापूर्तीचे श्लोक अभ्यासलेले असतात. समस्यापूर्तीचे अनेकांना माहीत असलेले उदाहरण म्हणजे 'तक्रं शक्रस्य दुर्लभम्' इंद्रासाठी ताक दुर्लभ आहे. आता अमृतपान करणाऱ्या इंद्राला ताकाचे काय महत्त्व असणार? परंतु ही समस्या पुढीलप्रमाणे सोडवलेली आहे. ‘भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः। कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ।।’ विसंगतीतही सुसंगती साधण्याचे कौशल्य यामध्ये दिसते.

३. दत्तपदी - या प्रकारामध्ये विशिष्ट शब्द दिले जातात. हे शब्द कोणत्याही प्रकारचे अगदी अन्य भाषेमधीलही असू शकतात. उदाहरणार्थ खाना, पीना, सोना, गाना इत्यादी. असे दिलेले शब्द संस्कृत काव्यरचनेमध्ये गुंफून अवधानी काव्य सादर करतात.

४. आशुकाव्य - यासाठी मराठीमध्ये प्रचलित असलेला शब्द आहे शीघ्र काव्य. यामध्ये विषय आणि छंद किंवा वृत्त सांगितले जाते. त्या विषयावर आणि त्याच वृत्तामध्ये अवधानी प्रत्येक आवर्तनामध्ये एक एक पद्य रचना करतात. याप्रकारे एकूण ४ पद्यरचना सादर केल्या जातात.

५. चित्रकाव्य - साहित्यरचनेमध्ये पद्मबन्ध, मुरजबन्ध, हारबन्ध, पुष्पगुच्छबन्ध अशा विविध प्रकारचे काव्यबंध सांगितलेले आहेत. पूजनीय टेंबे स्वामींनी अशा प्रकारची काव्यरचना केलेली काही जणांना माहिती असेल. या वैचित्र्यपूर्ण बंधामध्ये काव्यरचना केली जाते आणि फलकावर त्या बंधाच्या आकृतीसह ते लिहून प्रेक्षकांना दाखविले जाते.

काव्यरचना सोडून धारणा शक्तीवर आधारित असलेल्या अशा तीन प्रकारांचा परिचय आता करून घेऊ या.

६. काव्यवाचन - यामध्ये संस्कृत साहित्यातील श्लोकांचे गायन केले जाते. तो श्लोक कोणत्या ग्रंथातील आहे, कोणत्या वृत्तातील आहे तसेच संदर्भ अशी माहिती अवधानी प्रस्तुत करतात.

७. संख्याबंध - यामध्ये ५x५ असा तक्ता फलकावर काढलेला असतो. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने प्रथम एक संख्या सांगावयाची असते. त्यानंतर विशिष्ट रकान्यातील संख्या विचारावयाची असते. त्यातील संख्या अवधानी सांगतात आणि शेवटी त्या सर्व रकान्यांची उभी, आडवी, तिरकी कशाही प्रकारे बेरीज केली तर प्रथम दिलेली संख्या हीच बेरीज म्हणून येते.

8. अप्रस्तुतप्रसंग - अष्टावधानातील हा प्रकार एकूणच सादरीकरणातील रंजकतेसाठी आणि विनोद निर्मितीसाठी अपेक्षित आहे. यामध्ये प्रच्छक अवधानी व्यक्तीला विचलित करण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारतात किंवा मध्येच त्यावर स्वतःचे प्रश्न विचारतात. कधी कधी चाललेल्या विषयापासून दूर नेण्यासाठी विषयांतर करतात. अवधानी व्यक्तीच्या एकाग्रतेची कसोटी पाहण्याचा हा एक प्रकार आहे, असे म्हणता येईल.

याखेरीजही अनेक प्रकार आहेत. परंतु रत्नागिरीत होणाऱ्या अष्टावधान कलेची तोंडओळख व्हावी म्हणून हे प्रकारे येथे सांगितले आहेत. खरे तर याचा अनुभव घेतल्यानंतर या अष्टावधान कलेची खरी ओळख होईल असे वाटते. सध्या संस्कृत भाषेमध्ये हा प्रयोग होत असला तरी हा प्रयोग विविध भाषांच्या अभ्यासकांनासुद्धा करता येईल असा आहे. हे एक तंत्र आहे, ते आत्मसात केल्यानंतर कोणत्याही भाषेसाठी वापरता येईल.

रत्नागिरीमध्ये होणाऱ्या अष्टावधानामध्ये कर्नाटकातील बंगळुरू येथे वास्तव्य असलेले डॉ. उमामहेश्वर अवधानी आहेत. शृंगेरी येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले असून आतापर्यंत त्यांनी ३० ठिकाणी अष्टावधान सादर केले आहे. प्रच्छक म्हणून गोवा, मुंबई आणि रत्नागिरी येथील महाबलभट्ट, डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, सौ योगिता केळकर, कु. मयूरी जोशी, चैतन्य पाडळकर राजेश कुमार आणि कु. मैत्रेयी आमशेकर सहभागी होणार आहेत.

- डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी

संस्कृत भारती, कोकण प्रांताध्यक्ष

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande