जन्माष्टमी आणि श्रीकृष्णाची उपासना
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।। अर्थ : सर्व दुःखांचे हरण करणार्‍या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर करणार्‍या, शरणागतांना अभय देणार्‍या अन् निस्सीम भक्तांना आनंद प्रदान करणार्‍या, वासुदेव कृष्णाला माझा नमस्
श्रीकृष्ण


कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।

प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।

अर्थ : सर्व दुःखांचे हरण करणार्‍या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर करणार्‍या, शरणागतांना अभय देणार्‍या अन् निस्सीम भक्तांना आनंद प्रदान करणार्‍या, वासुदेव कृष्णाला माझा नमस्कार असो !

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती ‍वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व पहाणार आहोत.

1. महत्त्व - जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

2. उत्सव साजरा करण्याची पद्धत - या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

3. श्रीकृष्णाच्या पूजनाचा काळ - श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री 12 वाजता असते. त्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी. रात्री 12 वाजता शक्य असल्यास श्रीकृष्णजन्माचा पाळणा (गीत) लावावा.

4. श्रीकृष्णाचे पूजन

श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा : श्रीकृष्णजन्माचा पाळणा झाल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा करावी.

षोडशोपचार पूजन : ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी तशी पूजा करावी.

पंचोपचार पूजन : ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. पूजन करतांना ‘सपरिवाराय श्रीकृष्णाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा. श्रीकृष्णाला दही-पोहे आणि लोणी यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी. (पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)

श्रीकृष्णाला तुळस का वाहतात ? : तुळशीमध्ये कृष्णतत्त्व भरपूर प्रमाणात असते. काळी तुळस हे श्रीकृष्णाच्या मारक तत्त्वाचे, तर हिरव्या पानांची तुळस हे श्रीकृष्णाच्या तारक तत्त्वाचे प्रतीक आहे. यासाठीच श्रीकृष्णाला तुळस वाहतात.

5. श्रीकृष्णाची मानसपूजा - जे काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत, त्यांनी श्रीकृष्णाची ‘मानसपूजा’ करावी. (‘मानसपूजा’ याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या (मनाने) श्रीकृष्णाला अर्पण करणे.)

6. पूजनानंतर नामजप करणे - पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।’ हा नामजप करावा.

7. ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करणे - यानंतर श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिलेल्या ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही.’ या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी.’

8. दहीकाला - विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. हल्ली दहीकाल्याच्या निमित्ताने वाटमारी, बीभत्स नाच, महिलांची छेडछाड आदी गैरप्रकार सर्रास होतात. या गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन उत्सवातून देवतेच्या तत्त्वाचा लाभ तर होतच नाही, उलट धर्महानी होते. वरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले, तरच उत्सवाचे पावित्र्य टिकून उत्सवाचा खरा लाभ सर्वांना होईल. असे करणे ही समष्टी स्तरावरची भगवान श्रीकृष्णाची उपासनाच आहे.

9. हिंदूंनाे, धर्महानी राेखून धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन श्रीकृष्णाची कृपा संपादन करा !

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: । (हे अर्जुना, ऊठ, लढायला सिद्ध हो !)

श्रीकृष्णाच्या वरील आज्ञेनुसार अर्जुनाने धर्माचे रक्षण केले आणि तो श्रीकृष्णाला प्रिय झाला ! हिंदूंनो, देवतांचे विडंबन, धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांतील चोर्‍या, गोहत्या, मूर्तीभंजन या माध्यमांतून धर्मावर होणार्‍या आघातांविरुद्ध तुम्हीही स्वक्षमतेनुसार वैध मार्गाने लढा द्या !

भगवान श्रीकृष्ण ही धर्मसंस्थापनेची आराध्य देवता आहे. सध्याच्या काळात धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणे, ही सर्वोत्तम समष्टी साधना आहे. धर्मसंस्थापना म्हणजे समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना आदर्श करण्याचा प्रयत्न करणे होय. धर्मनिष्ठ हिंदूंनो, धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हा !

संदर्भ : सनातन संस्थेचा लघुग्रंथ 'श्रीकृष्ण आणि ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते

संपर्क क्र. : 9819242733

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande