अलिबाग, 11 ऑगस्ट (हिं.स.)। आळी आंबिवली येथे ग्रामपंचायत वासांबेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यावर चार जणांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. या हल्ल्यात कर्मचाऱ्याच्या आधीच्या जखमेवर गंभीर परिणाम होऊन जबड्याला पुन्हा दुखापत झाल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गौतम नधु कांबळे (36, रा. खाने आंबिवली) हे दुपारी दोनच्या सुमारास ग्रामपंचायत वासांबे येथे जात असताना, आळी आंबिवली येथील संजय पाटील यांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. त्यावर वाद वाढताच पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतक्यावर न थांबता त्यांनी सुनिल जाधव आणि आणखी दोन अनोळखी व्यक्तींना बोलावून घेतले. चौघांनी मिळून कांबळे यांना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या हल्ल्यात कांबळे यांच्या नाक व तोंडातून रक्तस्राव झाला.
विशेष म्हणजे, 2016 च्या अपघातात झालेल्या जबड्याच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेद्वारे बसवलेली प्लेट या मारहाणीमुळे निखळल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी कांबळे यांनी संजय पाटील, सुनिल जाधव आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास रसायनी पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant