जळगाव, 11 ऑगस्ट (हिं.स.) शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनीच्या भरवस्तीतील घरात देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांनी याठिकाणी छापेमारी करत या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यात देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेत या ठिकाणाहून पश्चिम बंगालमधील तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील रामानंदनगरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनीत घरात चालविल्या जात असलेल्या देहविक्रीच्या धंद्यावर छापा टाकला. पोलीस पथकाने डमी ग्राहकाला घटनास्थळी रवाना केले. यानंतर ग्राहकाने पोलिसांना इशारा दिल्यानंतर कॉलनीतील दोन मजली घरावर छापा टाकला असता अवैध प्रकारे चालविल्या जाणाऱ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान पोलिसांना घरात दिनेश संजय चौधरी (वय ३५) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती ऊर्फ भारती चौधरी (वय ४२) खालच्या खोलीत बसलेले दिसले. तर वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली असता, तेथे तरुणी व डमी ग्राहक आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पती- पत्नीला ताब्यात घेतले असून तरुणीची सुटका करण्यात आली आहे. भरवस्तीत अवैधपणे देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या पती- पत्नी विरोधात पोलिस कर्मचारी अर्चना घुनावत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलिस नाईक मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी आदींनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर