अकोला, 12 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला शहरातील कवाडे नगर, सिंथी कॅम्प, सादाम अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड विशाल लक्ष्मण ढोकने वय २५ वर्ष याचे वर यापुर्वी बेकायदेशीर जमाव जमविणे, दंगा करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सभासद दोषी असणे, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा करणे, बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे, हददपार आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड विशाल लक्ष्मण ढोकणे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यस एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १२/०८/२०२५ रोजी पारीत केला.
जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून विशाल लक्ष्मण ढोकणे याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १२/०८/२०२५ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि, माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन खदान येथील पोनि, मनोज केदारे, पोनि. मनोज बहुरे, पोलीस अंमलदार आकाश राठोड, नितीन मगर, वैभव कस्तुरे, संजय वानखडे, अमित दुबे, निलेश खंडारे, रोहीत पवार, अभिमन्यु सदाशिव, गासिर शेख यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे