अमरावती, 12 ऑगस्ट (हिं.स.) शिरखेड पोलीसांनी ग्राम धामणगाव येथील एका बंद घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भजन मंडळीचा वेष धारण करून टाकलेल्या धाडीत १३ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १,५४,९५० रुपये रोख, मोबाईल, मोटरसायकल व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. ठाणेदार सचिन लुले यांना काही दिवसांपासून गावात जुगार सुरु असल्याची माहिती मिळत होती. मात्र, जुगाऱ्यांचे खबरे गावाच्या वेशीवर असल्याने पोलीसांना थेट कारवाई करणे अवघड झाले होते.
११ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता मिळालेल्या माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशानुसार पथकाने पायी गावात प्रवेश करत छापा टाकला. सदर कारवाईत १३ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये रुपेश गावंडे, संतोष गावंडे, मोहन बरडे, विक्की कनेर, रविंद्र आकोलकर, योगेश झगडे, देवेंद्र मानकर, रुपेश ढाकुलकर, विजय भुजाडे, मनोज वैराळे, विनोद वैराळे, सुनील सुंदरकर व प्रज्वल अमृते (सर्व रा. धामणगाव काटसुर) यांचा समावेश आहे. कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन लुले यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात उपनिरीक्षक धुर्वे, पोहेकॉन्स्टेबल सचिन भाकरे, निस्ताने, वैभव घोगरे, अमित राऊत, मयुर कापडे व धीरज डोंगरे यांचा सहभाग होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी