पालघर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या फीची लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पालघर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोध लावून गुजरातमधून चौघा आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून तब्बल ४ लाख ४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पालघर पोलिसांविषयी कौतुकाचा सूर उमटला आहे.
ही धाडसी कारवाई दांडेकर कॉलेज, पालघर येथील चोरी प्रकरणाशी संबंधित आहे. २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २४ जुलै सकाळी ७.२५ या वेळेत कॉलेजच्या अकाउंट विभागाच्या तिजोरीतून विद्यार्थ्यांनी भरलेली १ लाख २४ हजार रुपयांची फी रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती. फिर्यादी मनोज शंकर परब यांच्या तक्रारीवरून पालघर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२५, भा.दं.वि. कलम ३८०, ४५७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या सहकार्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी विशेष तपास पथक तयार केले. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट उंबरगाव (गुजरात) गाठले. पोलिसांनी चोरीत सहभागी असलेले सराईत आरोपीमधील शुबम वीरेंद्र सिंग (वय २२, ट्रक चालक), मुरली मनोहर पवार (वय २३, रिक्षा चालक), अरुण लखन चव्हाण (वय १९, मिस्त्री) आणि फारस फिरोज खान (उंबरगाव, गुजरात) यांना सापळा रचून अटक केली. पोलिसांच्या कठोर चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या पैशांपैकी तब्बल ४,०४,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले.
या कारवाईत पो.उप.नि. रवींद्र वानखेडे, पो.उप.नि. गोरखनाथ राठोड, पो.ह. दिनेश गायकवाड, कैलास पाटील, भगवान आव्हाड, राकेश पाटील, संदीप सरदार, विशाल कडव, महेश सावंत (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच पो.उप.नि. रुपाली गुंड, पो.अं. रोहित तोरसकर (सायबर पोलीस ठाणे) यांचा सक्रिय सहभाग होता.
--------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL