मुंबई, 12 ऑगस्ट (हिं.स.)। 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता राज मोरे लवकरच 'वीण दोघातली ही तुटेना' या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदारच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजने आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना काही किस्से शेयर केले. पहिल्यांदा असं होणार आहे की मी एका मिडल क्लास मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. माझ्या भूमिकेचं नाव रोहन आहे, रोहन खूप शांत, मेहेनती मुलगा आहे. त्याचं स्वप्न आहे की त्याला आपल्या स्वानंदी ताईच लग्न करायचं आहे. त्याचा संघर्ष हा आहे की त्याला स्वतःच काही घडवायचे आहे जेणे करून तो अधिराच्या भावाला म्हणजेच समर राजवाडे समोर स्वतःला सिद्ध करू शकेल आणि समर आनंदाने रोहन-अधिराच्या नात्याला स्वीकारेल. मला या भूमिकेबद्दल तेव्हा कळलं जेव्हा 'नवरी मिळे हिटलरला' मालिका संपली, मी काही भूमिकांसाठी ऑडिशन्स देत होतो तेव्हा या भूमिकेबद्दल मला समजलं. मॉकशूट आणि रिडींग झालं त्यानंतर मला मेसेज आला की आपण हा शो करत आहोत. जेव्हा प्रोमो टीव्हीवर आला तेव्हा एकदम भारी वाटलं, माझ्या आईला एकदम भरून आलं कारण शाळेत असल्यापासून झी मराठी बघतोय आणि त्या चॅनेलवर माझा प्रोमो येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या मित्रानी माझं अभिनंदन केलं.
शूटिंग जेव्हा सुरु झाले तेव्हाचा एक किस्सा सांगावासा वाटतो. माझा आणि तेजश्री ताईचा पहिला सीन शूट होत होता आणि मला प्रचंड दडपण आलं होत आणि हे मी तिलाही सांगितल. ती मला म्हणाली मी ही एकेकाळी सिनियर कलाकारासोबत काम केले होते आणि मला ही दडपण आले होते आणि ते साहजिक आहे. तिने इतकं कंफर्टेबल केले आणि त्यानंतर आमचं नातं खूप छान फुलून आलं आणि हेच ऑनस्क्रीन आमचं भावा-बहिणीचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. किशोर महाबोले जे माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत त्यांच्याशी ही मस्त मैत्री झाली आहे. सुलभा आर्या मॅम ना मी पहिल्याच दिवशी जाऊन बोललो की मला तुमच्या कडून तुमच्या शूटचे आणि शाहरुख खानचे किस्से ऐकायचे आहेत.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने