नवी दिल्ली , 17 ऑगस्ट (हिं.स.)।भारताचे दुसरे अंतराळवीर आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आपल्या मातृभूमीत परतले आहेत. १५ जुलै रोजी कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ ‘स्प्लॅशडाऊन’नंतर ते रविवारी (दि.१७) पहाटे दिल्लीला पोहोचले. विमानतळावर त्यांचे स्वागत त्यांच्या कुटुंबीयांनी, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर अनेक नागरिकांनी केले. स्वागतासाठी विमानतळावर ढोल-नगारे वाजवले गेले आणि लोकांनी तिरंगा फडकावला.यावेळी उपस्थितांनी “भारत माता की जय”चे घोषही दिले.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्ल्यांचा उल्लेख केला होता. आता शुक्ला लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार असून, २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांनी त्यांना आपल्या अनुभवांची आणि शिकवणीची नोंद दस्तऐवजात स्वरूपात करावी, अशी विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यातील मोहिमांमध्ये त्याचा उपयोग होईल.
माहितीनुसार, सोमवार(दि.१८) रोजी लोकसभेत शुक्लांच्या मोहिमेवर विशेष चर्चा होणार आहे, ज्यामध्ये हे सांगितले जाईल की भारताचा अंतराळ कार्यक्रम २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने कसा मदत करतो आहे.
भारत परतताना शुक्ल्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की ते मिश्र भावनांमधून जात आहेत. त्यांनी लिहिले, “अमेरिकेत भेटलेल्या मित्रांना आणि कुटुंबाला सोडताना दुःख होते आहे, पण भारतात परतून आपल्या कुटुंबीयांना आणि देशबांधवांना भेटण्याचा आनंदही आहे. माझी कमांडर पैगी व्हिट्सन म्हणते – अंतराळ प्रवासात बदल हा एकच शाश्वत आहे, आणि जीवनातही तेच खरे आहे.” त्यांनी ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘यूं ही चला चल रही’ या गीताच्या ओळींनी पोस्ट संपवली.
लखनौमध्ये राहणाऱ्या शुक्ल्यांचे कुटुंब लॉन्च आणि लँडिंग दोन्हीवेळी उपस्थित होते. त्यांच्या वडिलांनी, श्री. शंभू दयाल शुक्ला यांनी सांगितले, “आमच्या मुलाने यशस्वी मोहीम पूर्ण केली आणि आता तो भारतात परतला, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही दिल्लीमध्ये त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहोत.”
ग्रुप कॅप्टन शुक्ला हे Axiom-4 मोहिमेचे पायलट होते. ही मोहीम २५ जून रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आली होती आणि २६ जून रोजी आयएसएसशी जोडली गेली. शुक्ला गेल्या एका वर्षापासून अमेरिका येथील नासा, Axiom आणि SpaceX यांच्या सुविधांवर प्रशिक्षण घेत होते. शुक्ल्यांचा अनुभव भारताच्या महत्वाकांक्षी मानवी अंतराळ कार्यक्रम ‘गगनयान’ (२०२७) साठी मोलाचा ठरेल. याशिवाय भारताने २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत मानवासहित चंद्र मोहीम साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode