मुंबई, ठाण्यात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; मंगळवारी शाळांना सुट्ट्या जाहीर
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई मनपांसह पालघर व बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मुंबई शहर व उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेसे
Heavy rains  Mumbai-Thane


ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई मनपांसह पालघर व बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मुंबई शहर व उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा उशिराने धावत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. विमानसेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला होता. मुसळधार पावसामुळे ठाणे मनपा, केडीएमसी, नवी मुंबई, पालघर व बुलढाण्यातील अनेक शाळांनाही सुट्टी देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील चेंबूर परिसरात मुसळधार पावसामुळे पालिकेच्या रुग्णालयात चार ते पाच फूट पाणी शिरले त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यातून वाट काढत रुग्णालयात प्रवेश करावा लागला. तर चुनाभट्टी विभागातील स्वदेशी मिल कामगाराच्या घरात पाणी शिरल्याने अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. याच भागात एमएमआरडीएची संरक्षक भिंत कोसळून सात झोपड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

किंग सर्कल परिसर गुडघाभर पाण्याखाली गेला असून वाहनचालकांची मोठी तारांबळ झाली. सायन, माटुंगा आणि घाटकोपर परिसरात वाहतूक कासवगतीने सुरू होती. सायन बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले. महापालिका कर्मचारी व वाहतूक पोलीस पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत असले तरी सततच्या पावसामुळे प्रयत्न निष्फळ ठरले.

ठाण्यातील परिस्थितीही गंभीर होती. अवघ्या चार तासांत 31.22 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सर्वाधिक 16.26 मिमी पाऊस पडला. ठाणे महापालिकेने अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज व उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. केडीएमसी, नवी मुंबई, पालघर व बुलढाण्यातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

गेल्या सहा तासांत मुंबईत 170 मिमी तर केवळ चेंबूरमध्ये 177 मिमी पाऊस पडला. पावसामुळे मुंबई लोकलची वाहतूक 14 ठिकाणी प्रभावित झाली. गाड्या बंद न पडता केवळ कासवगतीने धावत होत्या. दुपारी चारनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

आज सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान हायटाईडची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. पुढील 10 ते 12 तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संध्याकाळी मिळणाऱ्या अहवालानुसार उद्याच्या शाळांविषयी निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सर्वत्र पावसाने कहर सुरूच असल्याने नागरिकांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. प्रशासन व महापालिकेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून निचऱ्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाचा जोर पाहता मुंबईकरांना आणखी काही दिवस हा तगडा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande