नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)। जगातील कोणतीही ताकद भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्यापासून रोखू शकत नाही. असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले ते लंडन येथे आयोजित एका जागतिक आर्थिक परिषदेला ऑनलाईन पद्धतीने संबोधित होते. त्यांनी सांगितले की भारताला वेगाने विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकार परिवर्तनाच्या पुढील १०० दिवसांच्या अजेंड्यावर काम करत आहे. भारत जगातील सर्वात लोकप्रिय ग्राहक बाजारपेठ आणि आघाडीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. तसेच, सरकार व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभता वाढविण्यासाठी उपाययोजना करत आहे.
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की पुढील 100 दिवसांत सरकार 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करेल, ज्यामध्ये भारताला जलद गतीने पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की यात 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करणे, जाहीर केलेल्या ‘पंचप्रणां’चे पालन करणे आणि प्रत्येक नागरिकाने 2047 पर्यंत भारताला समृद्ध व विकसित राष्ट्र बनविण्याचे दायित्व आपल्या खांद्यावर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की या प्रयत्नातून १४० कोटी भारतीय एक संघ, एक कुटुंब म्हणून एकत्र येऊन वसाहतकालीन मानसिकता दूर करतील, भारताच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करतील. यासोबतच राष्ट्राची एकता आणि अखंडता यावर लक्ष केंद्रित करतील. गोयल म्हणाले, “आज झालेल्या एका बैठकीत आपण सामूहिकपणे संकल्प केला आहे की भारताला वेगाने पुढे नेण्याचा आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule