नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)
झुरिच ते दिल्ली ही विमानसेवा १७ ऑगस्ट रोजी तांत्रिक कारणांमुळे रद्द केल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले. टाटा समूहाच्या मालकीच्या विमानसेवा कंपनीने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, त्यांनी त्यांच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याची सर्वंकष तपासणी केली होती आणि त्यात कोणताही दोष आढळला नाही.
एका प्रवाशाने सांगितले की, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत एअर इंडियाने तांत्रिक कारणांमुळे शेवटच्या क्षणी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. ज्यात एका आंतरराष्ट्रीय उड्डाणाचा समावेश आहे. एअर इंडिया युरोपियन बाजारपेठेसाठी त्यांचे बोईंग ७८७-८ आणि ७८७-९ विमान वापरते.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, १७ ऑगस्ट रोजी झुरिच ते दिल्ली ही विमानसेवा AI152 तांत्रिक कारणांमुळे आणि नंतर झुरिचमध्ये रात्रीच्या कर्फ्यूमुळे रद्द करण्यात आली आहे. एअरलाइनने सांगितले की, प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानसेवा व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, पूर्ण परतफेड किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुन्हा बुकिंग करण्याचा पर्याय दिला जात आहे.
एअर इंडियाचे झुरिच ते दिल्ली विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी रद्द करण्यात आले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे एका प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर सांगितले. याआधी रविवारी कोची विमानतळावरून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणापूर्वी तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे