नाशिक, 29 ऑगस्ट (हिं.स.)।
चेहेडी गावात अपंग मुलीच्या व मुलाच्या नावावर बक्षीस पत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर तलाठीचे नाव गौरव शंकर दवंगे (३१, रा. अक्षर बंगला, निसर्ग नगर, म्हसरूळ) असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चेहेडी गावातील एका वयोवृद्ध महिलेकडे सर्वे क्र. ४/१/ह/प्लॉट/११, क्षेत्रफळ ११९.५३१ चौ.मी. एवढा प्लॉट होता. वयोमानानुसार तिने हा प्लॉट आपल्या अपंग मुलगी व मुलाच्या नावावर बक्षीस पत्राद्वारे नोंदविला. या प्रक्रियेसाठी तिने आपल्या भावाला सर्व कागदपत्रे सादर करण्याचा अधिकार दिला होता.
भावाने आवश्यक दस्तऐवज संबंधित तलाठी कार्यालयात दाखल केले. मात्र, लाचखोर तलाठी गौरव दवंगे यांनी सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे भावाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची खात्री करून चेहेडी तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे देताच लाचखोर तलाठी दवंगे याने ती लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी पथकाने साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी तक्रारदार भावाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी तलाठीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा हंडोरे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV