रत्नागिरी, 30 ऑगस्ट, (हिं. स.) : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी देवरूखच्या पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साध्या वेशात गस्त घालणाऱ्या देवरूखच्या दोन पोलीस हेडकॉन्स्टेबलना तरुणांचा संशय आल्याने सखोल चौकशी केल्यावर शिकारीचा उद्देश उघड झाला. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
रात्री गस्त घालताना विघ्रवली एस टी बस स्टॉप (देवरूख) ते सोनवडे रस्त्यावर दोघे जण डोक्याला बॅटरी लावलेले दिसले. गस्त घालणाऱ्या अभिषेक वेलणकर आणि सचिन कामेरकर या दोन हेडकॉन्स्टेबलनी त्या दोन स्कूटरस्वारांकडे विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांचाच संशय बळावला आणि अधिक चौकशी केली यापैकी एकाकडे जिवंत काडतूस आणि बंदूक आढळली.
प्रीतेश प्रतिपाल आडाव (वय २६ वर्षे, रा. कांजिवरा, देवरूख आणि साहिल संतोष कदम (वय १९, रा. ओझरे बौद्धवाडी) अशी अटक केलेल्या दोन तरुणांची नाव असून हे तरुण वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत दुचाकीसह गावठी बंदूक, जिवंत काडतूस बॅटरी जप्त करण्यात आली.
विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी