नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.)।, रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या संशयितास नाशिक रोड रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पकडले. या दलाचे पोलिस निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रवींद्र ठाकुर, अस्लम शहा, किशोर चौधरी, कॉन्स्टेबल मनीषकुमार सिंह व कॉन्स्टेबल के. के. यादव यांनी नाशिक रोड स्थानक परिसरात गस्तीदरम्यान ही कारवाई केली.
१४ ऑगस्ट रोजी अमरावती एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी-६ मधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली होती. संशयित व्यक्ती २६ ऑगस्टला तुलसी एक्सप्रेसमध्ये चढताना व उतरताना दिसली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न दिल्याने आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले.
या व्यक्तीने आपले नाव तेजस अजीत छाबडा (वय ३२, लोहिया रोड, नगर परिषदेजवळ, इगतपुरी) असे सांगितले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो रेल्वे गाड्यांच्या एसी कोचमध्ये चढताना उतरताना दिसून आला. देवगिरी एक्सप्रेसच्या ए-१ कोचमधून एक बॅग उतरवून प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर तपासत असल्याचे स्पष्ट झाले. त्या बॅगेमध्ये तिकीट निरीक्षक ए. के. यादव यांचे ओळखपत्र, पास, नवी ईएफटी बुक व काळ्या रंगाचा टीटीई कोट मिळून आला. या तिकीट निरीक्षकाने चोरीबाबत मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. तो गुन्हा नाशिक रोडला हस्तांतरित होत आहे. आरपीएफने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा नोंदविण्यात आला. संशयिताला या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV