नागपूर,03 ऑगस्ट (हिं.स.) : कुठलाही माणूस हा शिक्षणाने नव्हे तर सुशिक्षणाने मोठा होतो याचा विसर पडला आहे. प्रत्येकाने बुद्धीमान होण्यासोबतच ज्ञानीदेखील होण्याची गरज असून त्यासाठी शिक्षण नीती निर्धारित करणारे सरकार, शैक्षणिक संस्था, पालक आणि विद्यार्थी यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
नागपुरातील धरमपेठ शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त 'सामाजिक सेवाशिल्पी पुरस्कार' सोहळ्याचे रविवारी प्राचार्य विनायकराव फाटक स्मृती सभागृह, धरमपेठ म.पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भैय्याजी जोशी म्हणाले की, मागील काही वर्षात शिक्षणात विकृती आली असून वातावरण प्रदुषित झाले आहे. शिक्षणाचे मापदंड बदलले असून मूळ उद्देश उपेक्षिला जात आहे. सरकार, शिक्षण संस्था, शिक्षक व पालक या चार स्तंभांनी विद्यार्थी घडवण्याचे काम करावे तसेच बदललेल्या व चुकीच्या दिशेने चाललेल्या शिक्षणाच्या पद्धतीला आदर्श दिशा दाखविण्यावर भर द्यावा असे आवाहन भैय्याजी जोशी यांनी केले. स्वकर्तृत्वावर 96 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात वाटचाल करणा-या धरमपेठ शिक्षण संस्थेने समाजात सद्गुणाचे बीज पेरले आहे. सामाजिक कर्तव्याचे भान राखत चौकटीबाहेरचे शिक्षण देत वाटचाल करणारी ही संस्था आजच्या बदलत्या परिस्थितीत दीपस्तंभासारखी उभी आहे, असे गौरवोद्गारदेखील त्यांनी काढले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी