अकोला, 5 ऑगस्ट (हिं.स.)।
त्रयस्थ व्यक्तीकडून काही नागरिकांना बनावट शिधापत्रिका दिल्याची तक्रार पुरवठा कार्यालयास मिळाली आहे. प्रत्यक्षात शासनाकडून २ वर्षांपासून ई- शिधापत्रिकांचे वितरण होत आहे. ऑफलाईन शिधापत्रिका वितरण बंद आहे. त्यामुळे अनधिकृत पत्रिका देऊन नागरिकांची फसवणूक करणा-या किंवा बनावट पत्रिकांचा वापर करणा-या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे.
त्रयस्थांमार्फत मिळालेल्या बनावट शिधापत्रिकांचा वापर कार्यालयात विविध कामकाजाकरिता वापर होत असतांना निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये मागील दोन वर्षापासून शासनाचे आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. ई-शिधापत्रिका वितरण करण्यात येत आहे. प्राप्त तक्रारीनुसार अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शिधापत्रिकांच्या विविध कामकाजाकरिता तालुकानिहाय पुरवठा शाखेमध्ये नियुक्त असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशीच संपर्क करून आपले कामकाज पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन श्री. यन्नावार यांनी केले.
त्रयस्थ व्यक्तीकडून या कार्यालयातून कोणतेही काम केले जात नाही. कोणताही नागरिक त्रयस्थ व्यक्तीकडून शिधापत्रिकांचे किंवा पुरवठा संबंधीत कोणतेही कामकाज करून घेण्यासाठी कार्यालयात वावरताना किंवा आढळून आल्यास संबंधीतावर थेट फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल. त्रयस्थ व्यक्तीकडून शिधापत्रिकांचे कोणतेही काम करून घेऊ नये, तसेच त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे देऊन स्वतःची फसवणुक होऊ नये. पुरवठा संबंधीत कामकाजाकरीता नागरीकांनी अधिकृत केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशीच कार्यालयात येऊन शिधापत्रिकांचे काम पुर्ण करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रविंद्र यन्नावार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे