लातूर , 3 ऑगस्ट (हिं.स.)। महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार 01 ते 07 ऑगस्ट 2025 या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाला लातूर तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सचिन जाधव यांनी विशेष पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय आणि तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक, महसूल सेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सचिन जाधव यांनी तणावमुक्त जीवनासाठी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन
महसूल सप्ताहात 02 ऑगस्ट रोजी पात्र कुटुंबांना अतिक्रमित रहिवासी जागांचे पट्टे वाटप, 03 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी आणि दुतर्फा वृक्षलागवड, 04 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान, 05 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे अनुदान वाटप, 06 ऑगस्ट रोजी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करणे आणि 07 ऑगस्ट रोजी एम-सँड धोरणाची अंमलबजावणी तसेच सांगता समारंभ होणार आहे.
सर्व नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis