ब्रासिलिया, 3 ऑगस्ट (हिं.स.)
डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मानुष शाहला पुरुष
दुहेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत १० व्या
क्रमांकावर असलेली अव्वल मानांकित भारतीय जोडी बेनेडिक्ट डुडा आणि डांग किउ या
दुसऱ्या मानांकित जर्मन जोडीविरुद्ध २-३ अशी संघर्षपूर्ण अंतिम फेरीच्या लढतीत
पराभूत झाली.
डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धेत दोन भारतीय दुहेरी संघ अंतिम फेरीत
पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. मानव आणि मानुष यांनी या स्पर्धेत मजबूत दावेदार
म्हणून प्रवेश करत लक्षणीय कामगिरी केली. त्यांच्या या स्पर्धेतील मोहिमेची
सुरुवात जपानच्या सातोशी आयडा आणि मिझुकी ओईकावा यांच्यावर ३-१ असा विजय मिळवून
झाली. त्यानंतर त्यांनी पाच सामन्यांच्या उपांत्यापूर्व सामन्यात फ्लोरियन बोरासौद
आणि लिलियन बार्डेट यांचा पराभव करून मजबूत फ्रेंच आव्हानावर मात केली.
उपांत्य
फेरीत त्यांनी हुआंग यान-चेंग आणि कुओ
गुआन-होंग या चिनी तैपेई जोडीला पाच गेमच्या लढतीत पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश
केला. अंतिम सामन्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. पण हा निकाल जागतिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या
वाढत्या दर्जाचा पुरावा ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra