मुंबई, 30 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते. काल मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. त्यानंतर आंदोलनाला मुदतवाढ देण्यासाठी मराठा आंदोलकांनी पोलिसांकडे अर्ज केला होता आणि अखेर त्यांची मागणी मंजूर करण्यात आली. यामुळे उद्याही मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास एक दिवसाची परवानगी मिळाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आज आपला निर्धार कायम ठेवला असून, सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा त्यांचा ठाम दावा आहे. पहिल्या दिवशी सरकारकडून कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यात आला नव्हता.
दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली, त्यानंतर मंत्री न जाता शिंदे समितीला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी मैदानात पाठवण्यात आले. समितीने आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेत, सरकार कोणकोणत्या बाबींवर काम करत आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद, सातारा आणि औंध संस्थानातील गॅझेटिअर संदर्भातही स्पष्ट भूमिका घेतली. सातारा आणि हैदराबाद संस्थांचे गॅझेटिअर लागू करण्यासाठी कोणताही वेळ दिला जाणार नाही, तर औंध संस्थानच्या गॅझेटिअरचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्याची तयारी दर्शवली. याबाबत शिंदे समितीने सांगितले की, एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाचा आहे, शिंदे समितीचा नाही.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि ठाम भूमिका राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule