वॉशिंग्टन , 3 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विक्ट्री परेडच्या अगदी आधीच अध्यक्ष शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांच्यावर टोला लगावला आहे. ट्रम्प म्हणाले की, चीनच्या स्वातंत्र्यात अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती आणि जिनपिंग यांनी हे विसरू नये. ट्रम्प रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या भेटीमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आरोप केला की हे दोघे अमेरिकेविरुद्ध कट रचत आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रूथ’वर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘‘महत्वाचा प्रश्न हा आहे की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेने सांडलेल्या ‘रक्ताचा’ उल्लेख करतील का? चीनच्या विजयात अनेक अमेरिकनांनी आपले प्राण गमावले. मला आशा आहे की त्यांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण ठेवली जाईल! अमेरिकेविरुद्ध कट रचण्यासाठी व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग यांना माझ्याकडून शुभेच्छा.’’
खरं तर चीन बुधवार (३ सप्टेंबर) रोजी बीजिंगमध्ये विक्ट्री परेडचं आयोजन करणार आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाला ८० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही परेड आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील अनेक मोठे नेते या परेडसाठी चीनमध्ये पोहोचले आहेत. पुतिन आणि किम जोंग उन याठिकाणी एकत्र भेटले, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला जाणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही. ट्रम्प आधीपासूनच रशियावर नाराज आहेत आणि आता किम जोंग उन यांच्यासोबत पुतिन यांना पाहून ते चिडले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लावले आहे, पण भारताबाबत त्यांनी अधिक कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच एससीओ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी चीनमध्ये गेले होते. त्या वेळी ते पुतिन आणि जिनपिंग यांच्यासोबत दिसले होते. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर या तिघांची भेट ट्रम्पसाठी एक प्रकारचा संदेशच ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode