अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.) : धामणगाव रेल्वे येथील अंजनसिंगी ते मंगरूळला जोडणाऱ्या राज्य मार्गाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून डांबरीकरण उखडले आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग प्रवास करतो. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर अपघातग्रस्त होऊन जखमी झाले आहेत.शिदोडी येथील तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव शैलेश निस्ताने यांनी सांगितले की राज्य मार्ग असूनही प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अधिवक्ता महल्ले यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की श्रीमंतांसाठी मोठे महामार्ग बांधले जात आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या वापरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे. दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
समृद्धी, शक्तिपीठाकडे लक्ष, इकडे मात्र दुर्लक्ष
ग्रामीण भागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीकादेखील नागरिकांकडून केली जात आहे. समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग यांसारख्या भव्य योजनांना गती मिळत असताना ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा महत्त्वाच्या मार्गांची अवस्था मात्र दयनीय आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी