अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.): रेल्वे साखळी उड्डाणपूल बंद अवस्थेत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. यादरम्यान शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये अमरावती रेल्वे स्थानक बंद होणार असल्याची अफवा जोर धरू लागली आहे. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी अमरावती रेल्वे स्थानक बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमरावती रेल्वे उड्डाणपूल खराब झाल्यामुळे गत रविवारी २४ तारखेला मध्यरात्री वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. यामुळे रेल्वे स्थानक, हमालपुरा येथून जयस्तंभ चौक व राजकमल चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. याशिवाय राजकमल चौक व जयस्तंभ चौक येथून येणारी सर्व वाहतूक देखील बंद झाली आहे. रेल्वे उड्डाण पुलाचे गडर खराब झाले असून काही ठिकाणी जंग चढल्याचा अहवाल त्यामुळे महिनाभरापूर्वी रेल्वे उड्डाणपूलावरून जड वाहतुकींना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती. यानंतर २४ तारखेला रेल्वे उड्डाणपुलावरून वरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली होती.सध्या रेल्वे उड्डाण पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतुकीची कोंडी होत असतानाच आता अमरावती रेल्वे स्थान बंद होणार असल्याची अफवा सुरू झाली आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी अमरावती रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाड्या नियमितपणे सुटणार असून व या ठिकाणी गाड्या देखील येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खराब अवस्थेतील उड्डाणपुलाखाली गाड्यांना उभे करण्यात येऊ नये, याबाबत देखील काळजी घेतली जात असल्याचे बोलल्या जात आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी