रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) : रत्नागिरीजवळील मिरजोळे येथे राहणारी भक्ती जितेंद्र मयेकर या तरुणीचा खून तिचा प्रियकर दुर्वास पाटील (खंडाळा) याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दुर्वास दर्शन पाटील, विश्वास विजय पवार (बौद्धवाडी कळझोंडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (वाटद खंडाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दुर्वासचे भक्तीशी प्रेम संबंध होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. नंतर दुर्वासने तिच्याशी लग्न न करता आपले दुसरे लग्न ठरवले होते.
यातील फिर्यादी हेमंत जितेंद्र मयेकर (रा. मिरजोळे) यांची मोठी बहीण भक्ती जितेंद्र मयेकर गेल्या १६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घरातून रत्नागिरीत प्रशांतनगर येथील भाड्याच्या खोलीवर जात आहे, असे सांगून मिरजोळे येथील घरातून निघून गेलेली होती. दुसऱ्या दिवशीपासन तिचा फोन बंद येऊ लागला. म्हणून फिर्यादींनी वाट बघून तिसऱ्या दिवशी प्रशांतनगर येथील ती राहत असलेल्या भाड्याच्या घरी पाहिले, त्यावेळी खोलीला कुलूप होते.
नंतर फिर्यादींनी भक्तीच्या मित्रमैत्रिणी, तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भक्ती जितेंद्र मयेकर बेपत्ता नापत्ता झाल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी तपास सुरू केला.
बहीण भक्ती जितेंद्र मयेकर हिचे आरोपी दुर्वास पाटील याच्याशी प्रेमसंबंध होते. फिर्यादी यांचे घरातून तिला दुर्वास पाटीलशी लग्न करण्याकरिता विरोध नव्हता. परंतु, आरोपी दुर्वास पाटील याचे लग्न ठरल्याची माहिती भक्तीला मिळाली असावी, त्यामुळे तिने पळून जाऊन आरोपीशी लग्न केले असावे, असे फिर्यादीच्या घरातील सर्वांना वाटत होते. म्हणून ते दोघे सोबत येण्याची वाट बघत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे दुर्वास पाटीलने त्याचे दुसऱ्या मुलीशी ठरलेले लग्न भक्तीच्यामुळे तुटू नये, याकरिता त्याने जाणीवपूर्वक तिचे अपहरण करून तिचा घात केला असावा, असा संशय निर्माण झाला.
आरोपीकडे तपासाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता दुर्वासचे आणि भक्ती मयेकर या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, त्याला तिच्यासोबत लग्न करावयाचे नसल्याने तिचा अडसर दूर करण्यासाठी त्याने अन्य दोघांसोबत मिळून कट रचून भक्तीला रत्नागिरीतून खंडाळा येथे बोलावून तेथील बारच्या वरच्या खोलीत तिचा केबलने गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खंडाळा येथून आंबाघाट येथे नेऊन घाटाच्या परिसरात फेकून दिला
पोलिस आणि कुटुंबीयांनी आंबा घाटात शोध घेतला असता दरीत भक्तीचा मृतदेह सापडला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र, तिच्या हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी