कोल्हापूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या खास क्रीडा दिनानिमित्त, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे महाडिक यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, हॉकी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य हॉकी स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आले. या स्पर्धेमुळे हॉकीचा प्रसार आणि विकास होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.या सोहळ्यामुळे मेजर ध्यानचंद यांचे अतुलनीय कार्य पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आले आणि क्रीडा क्षेत्राबद्दलचा अभिमान नव्याने जागृत झाला. या कार्यक्रमाला शिवसेना खासदार धैर्यशील माने, एस. आर. जाधव, सुभाष पाटील, विद्या शिरस यांच्यासह अनेक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar