रायगड, 6 ऑगस्ट (हिं.स.)। पालीजवळील गावातील घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या सात दिवसात हा गुन्हा उघडकीस केला असून, सहा जणांना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे. या कारवाईने दरोडा टाकणाऱ्या टोळीला दणका मिळाला आहे.
सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले होते. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. गावातील ग्रामस्थ त्यांच्या घरात शनिवारी दि.26 जूलैला रात्री गाढ झोपेत होते. या संधीचा फायदा घेत काही टोळके रविवारी दि.27 पहाटेच्या सुमारास बंद दरवाजा तोडून गावातील एका घरात घुसले. अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील सर्वमंडळी भयभीत झाली होती.
या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. हातोंड येथील चव्हाण कुटुंबीयांच्या घरात दरोडेखोरांनी त्यांचे हात-पाय बांधून लूटमार केली होती. या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. घरातील दागीने, व इतर ऐवज लंपास करून ही टोळी पसार झाली. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 65 हजारहून अधिक मुद्देमाल चोरण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक मिलींद चापडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आला. या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सूरू केला. अखेर दरोडेखोर खालापूर, पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. वेगवेगळी पथके तयार करून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant