कोल्हापूर, 8 ऑगस्ट (हिं.स.) : भागीरथी महिला संस्थेच्या महिलांनी कळंबा जेलमध्ये प्रवेश केला आणि आम्हीही तुमच्या बहिणी आहोत हा विश्वास देत, बंदिजनांच्या हातावर मायेचा, स्नेहाचा धागा बांधला. भागीरथी संस्थेच्या महिलांनी बांधलेल्या राखीमुळे बंदीजनांच्या अश्रुंचा बांध फुटला. आज भागीरथी महिला संस्थेच्यावतीने रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम कळंबा कारागृहात पार पडला.
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने सौ. अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून कळंबा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विविध प्रकारच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेल्या आणि कुटूंबियांपासून दूर राहिलेल्या कैद्यांना बहिणीच्या मायेची प्रचिती आणून देत, भागीरथीच्या महिलांनी राखी बांधली आणि भाऊ- बहिणीच्या नात्याला अनोखा आयाम दिला. यावर्षी रक्षाबंधनाला आपले कुटूंब विशेषत: बहिण राखी बांधण्यासाठी नसणार आहे, या भावनेने अस्वस्थ झालेले अनेक कैदी हातावर राखी बांधताच गहिवरले. अनेकांना अश्रू अनावर झाले. तुरूंग अधीक्षक विवेक झेंडे आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कारागृहात शिक्षा भोगणार्या कैद्यांना रक्षाबंधन दिवशी बहिणी भेटल्याचा आनंद व्हावा, या हेतुने भागीरथी संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबवल्याची माहिती भागीरथी संस्थेच्या संचालिका शिवानी पाटील यांनी दिली. तर भागीरथी महिला संस्था सातत्याने समाजातील विविध घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे सदस्या सुलोचना नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान तुरूंगातील कैद्यांमार्फत प्रसाद बनवणे, गणेशमुर्ती बनवणे यासह विविध कामं केली जात असल्याचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांनी सांगितले. कैद्यांमार्फत बनवल्या जाणार्या विविध उत्पादनांबाबतही देवकर यांनी माहिती दिली. भागीरथी महिला संस्थेच्या या अभिनव उपक्रमाची देवकर यांनी प्रशंसा केली. यावेळी अभिजीत यादव, ऐश्वर्या देसाई, सीमा पालकर, स्नेहल खाडे यांच्यासह भागीरथी संस्थेच्या सभासद, आणि कारागृह कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar