हाँगकाँग, 14 सप्टेंबर (हिं.स.) हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत सात्विक आणि चिराग या भारताीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम फेरीत या जोडीला चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्याकडून तीन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना हाँगकाँग ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात अपयश आल्याने बॅडमिंटनप्रेमींची घोर निराशा झाली आहे.
आठव्या मानांकित भारतीय जोडीने पहिला गेम जिंकत अंतिम सामन्याची सुरुवात दिमाखात केली होती. पण चीनी जोडी लियांग आणि वांग यांनी पुनरागमन करत दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागला सामन्यावर वर्चस्व गाजवण्याची संधीच दिली नाही. आणि दुसरा गेम जिंकत सामन्यात बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक गेम चीनी जोडीने जिंकत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. अवघ्या ६१ मिनिटांत १९-२१, २१-१४, २१-१७ असा विजय लियांग आणि वांगने सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीवर मिळवला.
दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेते सात्विक आणि चिराग यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात थायलंड ओपननंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमध्ये एकही विजेतेपद पटकावलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे