मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये या आठवड्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. प्रेम, संघर्ष, नात्यांची परीक्षा आणि धक्कादायक वळणं! १५ ते २० सप्टेंबर या आठवड्यात पारू , वीण दोघातली ही तुटेना, कमळी, लक्ष्मी निवास आणि देवमाणूस मधला अध्या य या मालिकांमध्ये घडणार आहेत असे प्रसंग जे प्रेक्षकांना टीव्हीपुढे खिळवून ठेवतील. रोज काहीतरी वेगळं, थरारक आणि हृदयाला भिडणारं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तयार राहा, कारण हा आठवडा आहे सुपर खास.
'पारू' मालिकेमध्ये आदित्य आणि पारूच्या जीवनाला आता नवीन सुरुवात होणार आहे. श्रीमंतीत आणि ऐशोआरामात वाढलेला आदित्य जेव्हा सामान्य जगण्याच्या कटू वास्तवाशी भिडतो, तेव्हा पारू समजूतदारपणे आणि खंबीरतेने आदित्यला बळ देते. दिशाचे कटकारस्थान, गुंडांचा त्रास, आणि बेघर होण्याची वेळ येऊनही त्यांचं प्रेम कसं दृढ राहत हे या आठवड्यात बघायला मिळणार आहे. आदित्य पारूला शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो, ती एस.एस.सी. परीक्षेची तयारी करत आहे. दुसरीकडे, किर्लोस्कर घरातील शांतता आणि अहिल्याचं एकटेपण, दिशाच्या डावाला बळी पडण्याचा धोका निर्माण करतं पण नकळत आदित्य तिचं रक्षण करणार आहे.
'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये नात्यांची परीक्षा सुरु आहे. स्वानंदी आणि समरच्या नात्याला अनेक परीक्षा आणि गैरसमजांतुन जावं लागणार आहे. स्वानंदीची स्वतंत्र विचारसरणी आणि भावनिक स्थैर्य तिच्या निर्णयांमध्ये ठाम दिसून येतात. पण वर निवड मेळाव्याच्या गोंधळात तिच्या स्वाभिमान दुखावला जातो. या सगळ्यात, स्वानंदीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. दुसरीकडे, समरच्या आजीला वाटतं की स्वानंदीच समरसाठी योग्य जोडीदार आहे. या आठवड्यात मालिकेत विवाह, कुटुंब आणि स्वाभिमान याचा खेळ बघायला मिळणार आहे.
‘कमळी’ मध्ये धैर्य, खेळ आणि आत्मविश्वासाची लढाई सुरु आहे. कमळीचा प्रवास एका साध्या गावकरी मुलीपासून ते राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या खेळाडूपर्यंतचा सोपा नाही . हृषीच्या अपघातानंतर तिच्यावर जबाबदारी येते ती स्वतःला आणि त्याच्या विश्वासाला सिद्ध करण्याची. प्रतिस्पर्धी अनिका असलेल्या स्पर्धेत ती अपयशावर मात करून विजय मिळवेल का? तिचा हा जिद्दीचा प्रवास, प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या कष्टाने जिंकू शकेल का ? दुसरीकडे, सिद्धटेकमध्ये लपलेलं एक रहस्य उलगडण्याच्या मार्गावर राजन आहे, या सगळ्यामुळे पुढची कथा आणखी थरारक होणार यात शंका नाही.
तर ‘लक्ष्मी निवास’ मध्ये सत्य, प्रेम आणि न्यायासाठी लक्ष्मी, भावना आणि जान्हवी लढत आहेत. जयंतचं खोटं व्यक्तिमत्व आणि जान्हवीचं वाढतं आत्मभान या दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. सिद्धू आणि भावना यांच्यात हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण होऊ लागलाय. दरम्यान भावना आणि सिद्धू यांना समाजकार्याबद्दल सन्मान मिळतो, पण सुपर्णाच्या आनंदी कस्टडीसाठीच्या कारवायांनी भावना पुन्हा एकदा कठीण निर्णयांच्या उंबरठ्यावर येते. श्रीकांतच्या मृत्यूचं गूढ आणि श्रीनिवासच्या गाडीतील मृतदेह प्रेक्षकांना एका नव्या रहस्यकथेच्या सुरुवातीकडे घेऊन जाणार आहे.
‘देवमाणूस मधला अध्याय’ मध्ये मार्तंडचं खरं रूप गोपाळसमोर उघड होतं, जिथे तो रावणासारखा वागतो. गोपाळ त्याच्या वागणुकीने घाबरतो आणि संशयात पडतो. दरम्यान, मार्तंड अजितच्या घरी राहायला येतो, ज्यामुळे पुढे आणखी रहस्य आणि धक्के उलगडण्याची शक्यता वाढते.तेव्हा बघायला विसरू नका मनोरंजनानी भरलेला आठवडा १५ ते २० सप्टेंबर दररोज सदैव तुमची झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule