सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)अक्कलकोट शहर व तालुक्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पूर्वपदावर येत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळित झाले आहे. अक्कलकोट शहराला लागून असलेल्या समर्थ नगरमध्ये आजच्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आलेले होते. ओढे भरून मोठ्या प्रमाणात वाहत होते.
ढगफुटीचा व नुकसानीचा अंदाज आमदार व प्रशासकीय अधिकारी घेत असताना पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पिके, घरे, रस्ते, पुलांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार सचिन कल्याणशेट्टी दोन दिवसांपासून करीत आहेत.
आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरात ग्रामीण भागातील काही भागात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शेतात, चिखलात वाट काढत शेतीच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. अनेक गावातील शेतात नदी नाले ओढे व तलावाचे पाणी घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील माती वाहून गेली आहे, शेतीचे बांध तुटले आहेत तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आणि त्यांच्या शेतात पाणी उभे राहिले आहे. अनेकांचे पशुधन पाण्यात वाहून गेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड