मॉस्को, 15 सप्टेंबर (हिं.स.)। भारत आणि रशियाचे संबंध अतूट आहेत. वेळोवेळी दोन्ही देशांच्या मैत्रीचे साक्षीदार संपूर्ण जग झाले आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ (कर) लावल्यानंतर भारत-रशिया मैत्रीत तणाव येईल असे बोलले जात होते. मात्र, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने मॉस्कोसोबत सहकार्य सुरू ठेवले याबद्दल भारताची स्तुती केली आहे. रशियाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “दिल्लीसोबत आमची मैत्री तोडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील.”
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले कि, “भारताने दबाव आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देखील रशियासोबतचा बहुपक्षीय मैत्रीपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला आहे आणि तो वाढवण्याची कटिबद्धता देखील दर्शवली आहे. खरं सांगायचं तर, भारत आणि रशियामधील संबंध स्थैर्य आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न अयशस्वीच ठरेल.”
याचदरम्यान, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की, “भारतीय कंपन्या तिथूनच तेल खरेदी करतील जिथे त्यांना सर्वोत्तम सौदा मिळेल.” त्यांनी यावरही भर दिला की, “नवी दिल्ली आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत राहील.”
अमेरिकेने असा आरोप केला आहे की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून यूक्रेन युद्धात मॉस्कोला अप्रत्यक्षपणे मदत करत आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे.या दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने मॉस्कोवर थेट कठोर निर्बंध लावण्याचे टाळले आहे. तसेच, ट्रम्प यांनी अलीकडेच मान्य केले की रशियन तेलाच्या खरेदीवर भारतावर जड टॅरिफ लावल्यामुळे भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode