वॉशिंग्टन, 15 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासच्या डलास शहरात भारतीय वंशाच्या नागरिकाच्या झालेल्या हत्या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले,” माझ्या प्रशासनात या बेकायदेशीर गुन्हेगारांबद्दल सहानुभूती ठेवण्याचा काळ आता संपला आहे”
ट्रम्प म्हणाले, “मला टेक्सासच्या डलासमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्ती चंद्र नागमल्लैया यांच्या हत्या झाल्याच्या भयानक बातम्यांची माहिती मिळाली आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासमोरच, क्यूबातून आलेल्या एका बेकायदेशीर परदेशी व्यक्तीने त्यांची निर्दयपणे शिरच्छेद करून हत्या केली, जी गोष्ट आपल्या देशात कधीही घडू नये.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “या व्यक्तीला यापूर्वी बाल लैंगिक शोषण, कार चोरी अशा गंभीर गुन्ह्यांसाठी अटक झाली होती. पण जो बायडन यांच्या अकार्यक्षम कारभारात त्याला पुन्हा आपल्या देशात सोडण्यात आले, कारण क्यूबा अशा वाईट व्यक्तीला पुन्हा आपल्या देशात घ्यायला तयार नव्हता.”
ट्रम्प म्हणाले, “माझ्या प्रशासनात या बेकायदेशीर गुन्हेगारांबद्दल सहानुभूती ठेवण्याचा काळ आता संपला आहे! होमलँड सिक्युरिटीचे सचिव क्रिस्टी नोएम, अटर्नी जनरल पाम बॉन्डी, बॉर्डर झार टॉम होमन आणि माझ्या प्रशासनातील इतर अनेक अधिकारी अमेरिका पुन्हा सुरक्षित बनवण्यासाठी अप्रतिम काम करत आहेत. या गुन्हेगाराला आम्ही ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर कायद्याच्या पूर्ण ताकदीने खटला चालवला जाईल. त्याच्यावर प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट डिग्री) हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल!”
बुधवारी, १० सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलास शहरात ‘डाऊनटाउन सूट्स मोटेल’मध्ये मॅनेजर चंद्र नागमल्लैया यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचे वय केवळ ३७ वर्षे होते. ही हत्या इतकी भयंकर होती की आरोपीने चंद्र नागमल्लैया यांचे डोके धडापासून वेगळे केले होते.
चंद्र नागमल्लैया यांची हत्या त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांसमोर झाली. चंद्र नागमल्लैया हे भारतातील कर्नाटकमधून आलेले होते. या घटनेनंतर त्यांचा संपूर्ण परिवार धक्क्यात आहे. ज्याने ही हत्या केली, तो क्यूबाचा रहिवासी होता आणि अमेरिकेत काम करण्यासाठी आला होता. तो चंद्रसोबतच काम करत होता. या हत्याकांडाची चर्चा संपूर्ण अमेरिकेत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode