पंतप्रधानांकडून करण्यात आले विशेष कौतुक
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।भारताच्या समृद्ध ज्ञान परंपरेत प्राचीन पांडू लिपीतील असंख्य हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करणाऱ्या संस्थांमध्ये पुण्यातील भांडारकर संस्थेचा मोठा वाटा आहे. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील 'ज्ञान भारतम्' परिषदेत काढले. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटायझेशन झाले असल्याचे आणि हा सांस्कृतिक वारसा देशाच्या परंपरेतील एक महत्वाचा दस्तैवज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारताचा हा सगळा ज्ञानसाठा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो शाश्वतपणे टिकला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिल्लीत 'ज्ञान भारतम्' ही तीन दिवसीय परिषद (११ ते १३ सप्टेंबर) पार पडली. ज्याचे उद्घाटन केंद्रीय संस्कृति-मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी वेबपोर्टलचे उद्घाटन केले. या परिषदेमध्ये भांडारकर संशोधन मंदिराला निमंत्रित करण्यात आले होते. भांडारकर संस्थेने आपल्याकडील तीन हस्तलिखिते असलेल्या पोथ्या येथील प्रदर्शनात मांडल्या होत्या. संस्थेच्या वतीने मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, नियामक मंडळाचे सदस्य मनोज एरंडे आणि निबंधक व अभिरक्षक डॉ. श्रीनन्द बापट हे या परिषदेला उपस्थित होते. “मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर”मध्ये ज्याची नोंदणी झालेली आहे असे ऋग्वेदाचे हस्तलिखित, त्याचप्रकारचे नाट्यशास्त्राचे हस्तलिखित आणि भागवत पुरणाचे “विज्ञाननिधी” म्हणून भारत सरकार तर्फे जाहीर झालेले हस्तलिखित यांची मांडणी तिथे भांडारकर संस्थेकडून करण्यात आलेली होती.
या परिषदेमध्ये देशाच्या सर्व भागातून आलेल्या सुमारे अकराशे प्रतिनिधींनी भाग घेतला होता. डॉ. बापट यांनी त्याठिकाणी शोधनिबंधांचे वाचन देखील केले. प्रदर्शनातील भांडारकर संस्थेच्या दालनाला मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी भेट देऊन हस्तलिखितांची पाहणी केली व माहिती घेतली.
आपल्या देशात सुमारे एक कोटी हस्तलिखिते आहेत आणि त्यामध्ये आपला प्राचीन ज्ञानाचा मोठा ठेवा साठवलेला आहे. या सगळ्या ज्ञानाचे जतन, त्याची नोंदणी, अध्ययन, अनुवाद, प्रकाशन आणि डिजिटायझेशन करून ते सर्व लोकांपर्यंत जावं याकरिता 'ज्ञान भारतम्' या मिशनची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये भांडारकर संस्थेने आघाडी घेतली असून गेली अनेक वर्षे संस्था यादृष्टीने कार्य करीत आहे, अशी माहिती प्रा. वैशंपायन यांनी आज येथे सांगितली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु