चंद्रपूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
झाडीबोली रंगभूमीचे अभ्यासक, कलावंत आणि झाडीबोलीचे समर्थक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर यांच्या 'लालगुंजी' कादंबरीचे प्रकाशन बुधवारी (१७ सप्टेंबर) चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते असतील. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी खासदार हंसराज अहिर यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होईल. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित राहतील. नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिका विजया मारोतकर आणि नाशिक येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. तुषार चांदवडकर कादंबरीवर भाष्य करतील. डॉ. जनबंधू मेश्राम प्रथम वाचक म्हणून अभिप्राय नोंदवतील.
चंद्रपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्याम मोहरकर यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे अभ्यासक, समीक्षक म्हणून छाप सोडली आहे. 'झाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचाल', 'दृष्टीपथ' ही त्यांची पुस्तके 'झाडीपट्टी रंगभूमी : आकलन आणि आस्वाद' हा त्यांच्या साहित्यावर गौरवग्रंथ तसेच अनेक संपादन ग्रंथ प्रकाशित आहेत. 'लालगुंजी' ही कादंबरी पुणे येथील मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक म्हणून विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा, सृजन, सूर्यांश साहित्य मंच, झाडीबोली साहित्य मंडळ, फिनिक्स साहित्य मंचाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव