पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.) : पुणे शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील आज बहुतांश भागात शाळांना सुटी देण्यात आली आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील यंत्रणा मध्यरात्री पासूनच कार्यान्वित झाली आहे. सोलापूर रस्ता, लोणी काळभोर , कदम वाक वस्ती येथे मुसळधार पावसाने घरे, वाहने पाण्याखाली गेली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आह धायरी, वडगाव बुद्रुक, खडकवासला यासह पानशेत या भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागातील वाहतूक देखील मंदावली आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी कार्यालयात जाताना नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु