मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.) - नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपतींकडून गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यात आला. आज, सोमवारी त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. त्यानिमित्त राज्यपाल देवव्रत यांचा थोडक्यात परिचय येथे देत आहोत.
राज्यपाल देवव्रत यांचा अल्प परिचय आचार्य देवव्रत यांचा जन्म 18 जानेवारी 1959 रोजी झाला. त्यांनी पदवीधर, पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड., योगशास्त्रातील डिप्लोमा यांसह नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांचा अध्यापन व प्रशासन क्षेत्रात 45 वर्षांचा अनुभव आहे. ते 12 ऑगस्ट 2015 ते 21 जुलै 2019 या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते. या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. 22 जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात, तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. गुजरातमध्येच 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला. दरम्यान आज, 15 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.
त्यांना राष्ट्रवादी विचारसरणी व भारतीय संस्कृतीचा प्रसार, वैदिक मूल्ये व तत्त्वज्ञान यांवरील व्याख्याने, वृत्तपत्रे व मासिकांमध्ये लेखन, युवकांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे, योग व वैदिक जीवनशैली लोकप्रिय करण्यासाठी कार्यक्रम, गोधन संवर्धन व नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरे, एप्रिल 2015 मध्ये चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल स्थापन, योग, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार पद्धतींचे प्रशिक्षण व प्रसार, वृक्षलागवड व स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणमुक्त समाजनिर्मिती, ग्रंथलेखन आदी क्षेत्रांतील ज्ञान आहे आणि त्यात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
उल्लेखनीय कार्य पाहिल्यास त्यांनी 1981 ते जुलै 2015 पर्यंत गुरुकुल कुरुक्षेत्रचे प्रधानाचार्य म्हणून कार्य पाहिले. या काळात संपूर्ण गुरुकुलाचा कायापालट – आधुनिक सुविधा, नैसर्गिक चिकित्सालय, गोधन संवर्धन केंद्र, 180 एकरवर नैसर्गिक शेती, अर्ष महाविद्यालय, शूटिंग रेंज, इत्यादींवर भर दिला. आयआयटी, पीएमटी, एनडीए यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यातही त्यांनी काम केले.
त्यांनी आतापर्यंत अमेरिका, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फ्रान्स, इंग्लंड, इटली, व्हॅटिकन सिटी, नेपाळ, भूतान, सिंगापूर, मॉरिशस, थायलंड आदी देशांचा प्रवास केला आहे.
सन्मान व पुरस्कार (निवडक) यामध्ये त्यांना भारत ज्योती पुरस्कार (2003), अमेरिकन मेडल ऑफ ऑनर (2002), ग्रामीण भारतसेवा सन्मानपत्र (2005), जनहित शिक्षक श्री पुरस्कार (2009), हिमोत्कर्ष राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (2006), अक्षय ऊर्जा पुरस्कार (2011), विशिष्ट सेवा सन्मान, विद्वान रत्न, विविध संस्था व विद्यापीठांकडून मानद डी.लिट. (2023) अशा विविध उपाधींनी सन्मानित करण्यात आले आहे.
सदस्यत्वे व पदे (माजी/सध्याची) पाहिल्यास संस्थापक, चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल, अंबाला, विविध शैक्षणिक, सामाजिक, कृषी, गोसंवर्धन संस्था व मंडळांमध्ये पदाधिकारी, गुजरात सरकारतर्फे अधिपत्याखालील 24 विद्यापीठांचे कुलगुरू, गुजरात विद्यापीठ, एम.एस. युनिव्हर्सिटी बडोदा, गुजरात कॅन्सर सोसायटी, रेड क्रॉस, सैनिक कल्याण मंडळ, स्काऊट्स अँड गाईड्स यांसारख्या संस्थांचे अध्यक्ष/पदाधिकारी आदी ठिकाणी जबाबदारी पाहिली आहे.
साहित्यिक कार्यात संपादक – मासिक गुरुकुल दर्शन, ग्रंथलेखन : The Priceless Path of Health: Naturopathy, Stairs to Heaven, Valmiki’s Ram-Samvad (अनुवाद), Glorious History of Gurukul Kurukshetra, Natural Farming (हिंदी, इंग्रजी, गुजराती) याचा समावेश आहे.
ध्येये व उद्दिष्टांमध्ये वैदिक संस्कृती व परंपरेचे प्राचीन वैभव पुन्हा प्रस्थापित करणे आणि मानवतेत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा मानस आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी