लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते भव्य दिव्य होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी हंडरगुळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी (बा.) येथे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी सायं. ५ वा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मतदार संघासह जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले आहे.
ते उदगीर तालुक्यातील हंडरगुळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण संदर्भात पूर्व तयारी आढावा बैठकीत बोलत होते.
या कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आ.गोविंदाराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, प्रा. शाम डावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळाचे रामदास बेंबडे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आपल्या मतदार संघात मागील काळात आपण विविध गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला असुन महापुरुषांच्या पुतळ्याला पाहिले की प्रेरणा व ऊर्जा मिळते. आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतात. त्यामुळे आपण महापुरुषांचे पुतळे उभारत आहोत.
या निमित्त पूर्व तयारीचा आढावा आ.बनसोडे यांनी घेवुन मतदार संघातील सर्व जनतेनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
यावेळी आजूबाजूच्या अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच,चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षातील सामाजिक व राजकीय नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis