सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)राज्यात डान्स बारला बंदी असल्याने रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाकडून सादरीकरणाचे परवाने घेऊन कला केंद्र सुरू करण्याचा ट्रेंड सर्वत्र सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात १ एप्रिल २००५ ते २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत २६ जणांनी अशी प्रमाणपत्रे मिळविली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली यातील काही कला केंद्रात वेगळ्याच कार्यक्रमाच्या वैयक्तिक ‘बैठका’ सुरू असतात.
राज्यात डॉन्सबारवर बंदी आल्यानंतर ग्रामीण भागात विशेषत: महामार्गालगत कला केंद्राच्या नावाखाली अनेक ‘प्रति डान्सबार’ सुरू झाले. कला केंद्रातील नर्तकीसाठी वैरागजवळ सासुरे येथे बीड जिल्ह्यातील लुखामसला गावच्या माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याने कला केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जामखेड (जि.अहिल्यानगर) व पारगावजवळील (जि.धाराशिव) एका कला केंद्रात संबंधित नर्तकी नृत्य करत होती.
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ पर्यंत अशा प्रकारच्या २६ कला केंद्रांची नोंदणी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे झालेली आहे. यातील मोजकीच कला केंद्रे लावणीच्या संवर्धनाचे काम करतात. इतर कला केंद्रावर लावणीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली बैठका सुरू असतात. कला केंद्रामध्ये अनेक वेळा गोळीबार, मारामाऱ्या झाल्या असून यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी व व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड