त्रंबकेश्वर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
- नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे बांधकाम मंत्री यांना ट्विटर द्वारे तक्रार करून काय परिस्थिती आहे याचे कथन केले दरम्यान या रस्त्याची परिस्थिती पाहून सुप्रिया सुळे देखील संतप्त झाल्या.
-त्र्यंबकेश्वर हा वर्दळीचा रस्ता असून, तुपादेवी फाटा ते पेगलवाडी फाटा पर्यंत रस्त्याची अवस्था अतिश दयनीय आहे. वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. आज सुप्रिया सुळे देखील याच रस्त्यावरून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आल्या. त्यावेळी त्यांना या रस्त्यांवर पडलेले भले मोठे खड्डे दिसले. त्यानंतर त्यांनी लगेचच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पोस्ट टॅग करत त्यांच्याकडे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली. सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “नाशिक ते त्र्यंबकेश्वर या राज्य मार्गाची अतिशय वाईट अवस्था आहे. जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मार्गावरुन भाविकांची ये-जा असते. सध्या रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता वाहतूकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि सोयीचा देखील राहिलेला नाही. विनंती आहे की, कृपया आपण हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा”, असे त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा आरती केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे युवक अध्यक्ष व मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम काडलग उपस्थित होते. यावेळी पुरोहित्य मयूर थेटे व सहकारी यांनी करत विजयी भव असे आशीर्वाद दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV