जळगाव , 15 सप्टेंबर (हिं.स.) : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिला वाममार्गाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान कोल्हे नगर परिसरात सुरू होता. या प्रकरणी पती-पत्नीसह एका तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम वाडीतील तरुणीने माझ्या मैत्रिणीकडे काम केल्यास तुला खूप पैसे मिळतील, असे सांगून या मुलीची सतीश ऊर्फ मनोज सुभाष पाटील व सरला सतीश पाटील (रा. पौर्णिमा बंगला, कोल्हे नगर) यांच्याशी ओळख करून दिली. ४ सप्टेंबर रोजी या मुलीचे तिच्या आईशी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. सुरुवातीला भुसावळ व तेथून कोल्हे नगरात पौर्णिमा बंगला येथे ती आली. तिच्या शोधात जिल्हा पेठ पोलिस पौर्णिमा बंगला येथे गेले व तिला पोलिस ठाण्यात आणले. तेथे तिने आईसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधारगृह व नंतर शासकीय आशादीप वसतिगृहात दाखल केले. तिची प्रकृती खराब झाल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता, तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी मुलीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सतीश पाटील, सरला पाटील व तुकाराम वाडीतील तरुणीविरुद्ध बलात्कार, पोक्सो तसेच पीटा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर