अमरावती : देशमुख लॉन ते रहाटगाव रस्ता खड्ड्यांनी भरलेला; आंदोलनाचा इशारा
अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) : शेगाव – रहाटगाव रस्ता, विशेषतः देशमुख लॉन ते रहाटगाव पेट्रोल पंप आणि माइलस्टोन रेस्टॉरंटपर्यंतचा मार्ग अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गावरून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते, परंतु र
देशमुख लॉन ते रहाटगाव रस्ता खड्ड्यांनी भरलेला; तीन दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ‘बेशरम आंदोलन’


अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.) : शेगाव – रहाटगाव रस्ता, विशेषतः देशमुख लॉन ते रहाटगाव पेट्रोल पंप आणि माइलस्टोन रेस्टॉरंटपर्यंतचा मार्ग अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गावरून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते, परंतु रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता, रहिवाशांनी आता तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी महानगरपालिका आणि बांधकाम विभागाला यासंदर्भात अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या रस्त्याशी सुमारे ५० हून अधिक वसाहती जोडलेल्या असून, संपूर्ण जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधील नागरिक याचा वापर करतात. तरीदेखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे आज रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, पुढील तीन दिवसांत जर रस्त्याचे डागडुजी व डांबरीकरणाचे काम सुरु झाले नाही, तर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ‘बेशरम’ झाडे लावून निषेध नोंदवला जाईल. या अनोख्या आंदोलनासाठी नागरिक सज्ज झाले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास जबाबदार फक्त महानगरपालिका प्रशासन व बांधकाम विभाग असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर जागे होण्याचे आवाहन केले असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande