नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हि.स.) : भारताच्या मुद्रण आणि पॅकेजिंग उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक घडामोडीत इंडियन प्रिंटिंग, पॅकेजिंग अॅण्ड अलाइड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयपीएएमए) आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ प्रिंटर्स अॅण्ड पॅकेजर्स (एआयएफपीपी) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत करण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील आयपीएएमए कार्यालयात सोमवारी १५ सप्टेंबर रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार उद्योग क्षेत्रातील दोन अग्रगण्य संघटनांना एकत्र आणून नवकल्पना , सहकार्य आणि जागतिक पातळीवरील मान्यता यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल. सध्या देशभरात सुमारे २.५ लाख उद्योजक या क्षेत्राशी निगडित असून, हा करार त्यांच्या कार्यास नवसंजीवनी देणारा ठरेल. तसेच, आयपीएएमए आणि एआयएफपीपी यांना प्रदर्शन व उद्योगसंबंधी उपक्रमांसाठी विशेष धोरणात्मक भागीदार म्हणून मान्यता मिळेल.
या करारावर आयपीएएमएचे सरचिटणीस इकबाल सिंग आणि एआयएफपीपीचे सरचिटणीस सुनील जैन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या उपक्रमात आयपीएएमएचे अध्यक्ष जयवीर सिंग आणि एआयएफपीपीचे प्रमुख अश्विनी गुप्ता यांचे मोलाचे योगदान राहिले.
या वेळी उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये आर. सुरेश कुमार, धरमपाल रावत, शिवकुमार शर्मा, कुलजीत सिंग मान, प्रशांत वत्स, राजेश सरदाना, विजय मोहन, संदीप अग्रवाल, मुकेश कुमार, प्रशांत अग्रवाल, दीपक भाटिया आणि प्रा. कमल मोहन चोप्रा यांचा समावेश होता.
ही ऐतिहासिक भागीदारी इंट्रापॅक इंडिया २०२५ या प्रदर्शानातून प्रारंभ होईल. हे प्रदर्शन १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत इंडिया एक्स्पो सेंटर अॅण्ड मार्ट, ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी पॅकेजिंग उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात येईल आणि एक विशेष सन्मान समारंभही आयोजित केला जाईल.
या करारानुसार, आयपीएएमए आयोजनस्थळ, बैठक व्यवस्था, प्रसार माध्यमांची जबाबदारी सांभाळेल, तर एआयएफपीपी पुरस्कार संरचना, प्रवेश मूल्यांकन व कार्यक्रम नियोजन यांचे नेतृत्व करेल.
हा संयुक्त उपक्रम प्रिंटपॅक इंडिया २०२७ या १७व्या जागतिक प्रदर्शानापर्यंत विस्तारित राहील. त्या अनुषंगाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वितरण, तसेच प्रिंटपॅक राजस्थान, प्रिंटपॅक ईशान्य भारत यांसारख्या प्रादेशिक उपक्रमांत चर्चासत्रे, कार्यशाळा व गौरव पुरस्कारांचे आयोजन केले जाईल. आयपीएएमएचे अध्यक्ष जयवीर सिंग यांनी या कराराला एक ऐतिहासिक टप्पा असे संबोधून सांगितले की, हा करार भारताच्या मुद्रण व पॅकेजिंग उद्योगाला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवून देईल.
या वेळी प्रा. कमल मोहन चोप्रा यांनी जयवीर सिंग यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक करत असे मत व्यक्त केले की, हा करार नवकल्पनांना चालना देईल, उत्कृष्टतेचा गौरव करेल आणि या क्षेत्रातील प्रतिभावंतांना एकत्र आणण्याच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करेल.
ही भागीदारी केवळ औद्योगिक प्रगतीच नव्हे, तर सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्याच्या पुनर्जागरणाला चालना देणारी ठरेल. त्यामुळे भारत प्रिंटिंग आणि पॅकेजिंग नवोपक्रमांचा जागतिक केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल.
हा सामंजस्य करार प्रिंटपॅक इंडिया २०२७ पर्यंत वैध राहणार असून, या कालावधीत कोणतीही संघटना दुसऱ्या धोरणात्मक भागीदाराला मान्यता देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे एक दृढ, एकवटलेला आणि दीर्घकालीन सहयोग साध्य होणार आहे.
तसेच, या करारात गोपनीयता, वाद निवारण व भावी विस्ताराच्या प्रक्रियेचे स्पष्ट रूपरेषा ठरविण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या मुद्रण व पॅकेजिंग क्षेत्राला अभूतपूर्व उंची प्राप्त होणार असून, नवप्रवर्तन व समृद्धीचा एक नवा अध्याय सुरू होईल.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी